सिंदखेडराजा (बुलडाणा) : छत्रपतींचा आशीर्वाद, मागणारे भाजपवाले खोटारडे असून, त्यांच्या गुजरात सरकारने इंग्रजी पाठय़पुस्तकात छत्रपती शिवराय व मॉ जिजाऊ यांची बदनामी केली असून, ते आता संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करीत मतं मागत आहेत. अशा लोकांना तुम्ही निवडून देणार काय, असा सवाल उपस्थित करून या प्रवृत्तींना महाराष्ट्रात थारा देऊ नका, असे आवाहन शरद पवार यांनी केले. सिंदखेडराजा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रेखाताई खेडेकर यांच्या प्रचारार्थ मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, मोदी सरकारने साखर निर्यातीवरील अनुदान बंद केले. देश परकीय शक्तींच्या कारवायांनी त्रस्त आहे, सीमेवर सैनिक मारले जात आहेत, हजारो लोकांचे स्थलांतर होत आहे, असे असताना पंतप्रधान लष्कराला शक्ती देण्याचे काम करण्याऐवजी राज्यातील विधानसभा निवडणुकीला महत्त्व देत आहेत, हे दुर्दैव असल्याचा आरोप पवार यांनी केला. यावेळी रेखाताई खेडेकर यांनी त्यांच्या राजकीय जीवनाचा आलेख मांडून आपले गाव याच मतदारसंघात आहे, असे सांगून आजपर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. जिजाऊंची लेक या नात्याने आपण आपल्याच कुटुंबात आलो आहोत, असेही रेखाताई खेडेकर यांनी स्पष्ट केले. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आपण जिल्हा बँकेला मदत न मिळाल्याने निवडणूक लढविली नाही, असे स्पष्ट करीत शरद पवार यांनी या बँकेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भांडणात मुख्यमंत्र्यांनी या बँकेस मदत केली नाही, असा आरोप त्यांनी केला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अँड.नाझेर काझी यांनी केले. संचालन अजीम नवाज राही तर आभार जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी मानले. * सिंदखेडराजा मतदारसंघाचे तिकीट आपण डॉ.राजेंद्र शिंगणे यांना दिले होते; मात्र त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला व रेखाताई खेडेकर यांच्यासाठी आग्रह धरला. त्यांच्यामुळेच रेखाताईंना आपण उमेदवारी दिली असल्याने विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा केंद्रीय बँकेला अवसायनातून बाहेर काढण्यासोबतच डॉ. शिंगणे यांचेही राजकीय पुनर्वसन केले जाईल, असे अभिवचन शरद पवार यांनी यावेळी दिले.
मॉ जिजाऊंची बदनामी करणा-यांना तुम्ही निवडून देणार काय ?
By admin | Updated: October 10, 2014 00:22 IST