वाशिम : अमित झनक.. राजेंद्र पाटणी.. लखन मलिक.. प्रकाश डहाके.. सुभाष ठाकरे.. सुरेश इंगळे.. विजय जाधव..अशा एकापेक्षा एक मातब्बर नेत्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला १९ ऑक्टोबरला होणार आहे. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व रिसोड या तिन्ही मतदारसंघात सकाळी ८ वाजतापासूनच मतमोजणी सुरू होणार असून, प्रशासकीय यंत्रणेसह राजकारणीही मतमोजणीसाठी सज्ज झाले असल्याचे दिसून येत आहे. निकालानंतर गुलाल उडणारच आहे, मात्र त्यात कोण रंगणार, याची धाकधूक कमालीची वाढली आहे. लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेनंतर मतदारांविषयी अचूक अंदाज व्यक्त करण्याचे दिवस सरले, अशीच सध्याची स्थिती आहे; परंतु गेल्या दोन दिवसांत मांडण्यात आलेल्या सर्व्हेनंतर अस्वस्थता पसरली आहे. जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघाचे निकाल काय लागणार, याबाबत संभ्रम पसरलेला आहे. प्रत्येक पक्षाकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत. त्यामुळे मातब्बरांचे काय होणार, याविषयी उत्सुकता आहे. विशेषत: जिल्ह्यातील कारंजाची लढत लक्षवेधी ठरत आहे. येथे विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश डहाके, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, माजी आमदार राजेंद्र पाटणी यांनी परस्परांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. रिसोडमध्ये विद्यमान आमदार अमित झनक व माजी आमदार विजय जाधव यांच्यातील लढत तुल्यबळ आहे. वाशिममध्येही आजी व माजी आमदारांमध्ये लढत आहे. १९ ऑक्टोबरच्या मतमोजणीत या दिग्गजांचे राजकीय भवितव्य काय राहणार, याची सर्वांंना उत्सुकता आहे.
आमदार कोण? आज होणार फैसला
By admin | Updated: October 19, 2014 00:39 IST