उंबर्डा बाजार : यावर्षी परिसरात गहू व हरभरा या रबी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. गत काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे हे पीक संकटात सापडले होते; परंतु आता वातावरण निरभ्र झाल्याने ही पिके बहरली आहेत. त्यात गहू पीक चांगलेच बहरात असून, सद्य:स्थितीत पिकाच्या ओंब्याही परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे यंदा या पिकाचे उत्पादन वाढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
गत चार वर्षांपासून शेतकरी विविध नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहेत. यंदाही खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांनी त्रस्त केल्यामुळे उडीद, मूग, सोयाबीन, कपाशी या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, कित्येक शेतकऱ्यांना पिकांसाठी केलेला खर्चही वसूल होऊ शकला नाही. दरम्यान, दमदार पावसामुळे प्रकल्प, विहिरी, कूपनलिकांची पातळी काठोकाठ झाल्याने खरीप हंगामातील कसर रबी हंगामात काढण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली. सिंचनासाठी मुबलक पाणी असल्याने उंबर्डा बाजार परिसरात यंदा गहू, हरभरा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. तथापि, गत महिन्याच्या अखेरपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हरभरा, गहू पिके संकटात सापडली. या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले. आता मात्र वातावरण निवळले असून, आकाश निरभ्र असतानाच थंडीचा जोरही वाढला. त्यामुळे रबी पिके चांगली बहरली आहेत. त्यात गहू पिकाची स्थिती उत्तम आहे. या पिकाच्या ओंब्याही परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे यंदा या पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.
120121/12wsm_7_12012021_35.jpg
पोषक वातावरणामुळे गहू पीक बहरले