वाशिम: सध्या पाणीटंचाईचे संकट भीषण रूप धारण करीत आहे. या पृष्ठभूमीवर जलसंवर्धन ही काळाची गरज झाली आहे. जलसंवर्धनाला लोकचळवळीचे रूप देण्याच्या दृष्टीने वाशिम जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात गावागावांमध्ये जलरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे जलरक्षण गावातील जलसंवर्धन व जलवापरावर लक्ष ठेवणार आहेत. पर्यावरणाच्या र्हासामुळे पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी वाहून जाते. गत काही वर्षांपासून सरासरीएवढा पाऊस पडत असला तरी धरणे, नदी, नाले कोरडे असून, दुष्काळ कायम आहे. त्यामुळे गावागावांत पडणार्या पावसाच्या पाण्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्याकरिता गावागावांतच पाणी अडविणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने गावातच जलसंवर्धन करण्याकरिता जलरक्षकांची निवड करण्यात आली आहे. जलसंवर्धनासाठी शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियानासह विविध अभियान राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागात जलसंवर्धन करून जलसाठा वाढविण्यावर शासनाचा भर आहे. त्याकरिता वाशिम जिल्हा परिषदेने स्वच्छता व जलजागृती सप्ताह अंतर्गत जलरक्षकांची नेमणूक केली आहे. जलसुरक्षक हे पाण्याचे संरक्षक असून, गावाला शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईच्या संकटप्रसंगी गावकर्यांना मदत करण्यासह पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. पावसाळ्यामध्ये पडणारे पाणी कसे संवर्धित करता येईल, पेरणी करताना कोणत्या पिकांची पेरणी करावी, याचेही नियोजन करावे लागणार आहे. गावात उपलब्ध असलेल्या पाण्यानुसार शेतकर्यांनी पिकांचे नियोजन करून जास्त पाणी लागणार्या पिकांची पेरणी न करण्याचे आवाहन शेतकर्यांना करण्याची जबाबदारी जलरक्षकांवर सोपविण्यात आली आहे.
गावांमध्ये जलसंवर्धनासाठी जलरक्षकांची नियुक्ती
By admin | Updated: March 19, 2016 01:18 IST