वाशिम : ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मालकीची स्थावर मालमत्ता, भूखंड कुठे आणि किती प्रमाणात आहेत, याचा शोध घेण्यात अखेर जिल्हा परिषद प्रशासनाला यश आले आहे.अकोला जिलच्या विभाजनातून १९९८ साली तयार झालेल्या वाशिम जिल्हा परिषदेकडे त्यांच्या वाट्याची मालमत्ता हस्तांतरीत होणे अपेक्षित होते; मात्र १७ वर्षानंतरही अनेक ठिकाणी महसूल विभागाच्या कागदपत्रांवर अकोला जिल्हा परिषद असा उल्लेख आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेची एकूण स्थावर मालमत्ता किती, याचा कोणताही लेखाजोखा जिल्हा परिषदेकडे नसल्याने अनेक ठिकाणी घोळ झाला. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभेत सदस्यांसह पदाधिकार्यांनी आवाज उठविला होता. गतऑगस्ट महिन्यात जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी जि.प. मालकीच्या मालमत्तेचा मुद्दा गांभीर्याने घेऊन सामान्य प्रशासन विभागाला समित्या गठीत करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.आता त्रिस्तरीय समितीचे सर्व अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर झाले असून, या अहवालानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. स्थावर मालमत्तेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी कृती आराखडाही आखण्यात येणार आहे, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.
वाशिम जि.प.ने घेतला स्वमालकीच्या मालमत्तांचा शोध!
By admin | Updated: April 22, 2017 00:43 IST