लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनाच्या घोषणेनुसार ३१ मेपर्यंत नाफेडच्या तूर खरेदीला इतर जिल्ह्यात मुदतवाढ दिली असताना संपूर्ण वाशिम जिल्ह्यात ३१ मेपासून शासकीय तूर खरेदी बंद करण्यात आली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात मात्र अद्यापही तूर मोजणी सुरू असल्याची माहिती संबंधितांनी दिली. आता या संदर्भात तत्काळ जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश दिल्याचे जिल्हा सहायक निबंधकांनी सांगितले.राज्य शासनाने १६ मे रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ३१ मेपर्यंत तूर खरेदी करण्याची घोषणा केल्यानंतर वाशिम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड, वाशिम, मंगरूळपीर व कारंजा येथे बाजार समिती परिसरात नाफेड केंद्रांवर शेतकऱ्यांना टोकन देऊन तूर खरेदी करण्यात आली; मात्र नाफेड केंद्रांवर आवश्यक त्या वजनकाट्यांचा व मनुष्यबळाचा अभाव यामुळे अंतिम मुदतीपर्यंत अर्थात ३१ मे पर्यंत टोकन मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही नाफेड केंद्रांवर टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची एकूण चार लाख ८३ हजार ६५३ क्विंटल तूर मोजणी शिल्लक आहे. दरम्यान, जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांनी बाजार समित्यांना सूचना दिल्यानुसार, ३० मे पर्यंत टोकण घेतलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी यापुढेही केली जाणार असल्याचे बाजार समितीच्या सचिवांनी स्पष्ट केले होते; परंतु ३१ मे रोजीच्या मोजणीसाठी नियोजित शेतकऱ्यांपैकी वंचित राहिलेल्या ३८ शेतकऱ्यांची तूर ३ जूनपर्यंत मोजण्यात आली. वाशिम येथे ३१ मे पर्यंत एक लाख ४० हजार क्विंटल तूर खरेदी करणे शिल्लक आहे, रिसोड येथे एक लाख १९ हजार ६६० क्विंटल तूर खरेदी करणे शिल्लक आहे. कारंजा येथे ८० हजार क्विंटल तूर मोजणी येथे शिल्लक आहे. मंगरूळपीर येथे ६५ हजार क्विंटल तूर मोजणी शिल्लक आहे, तर मालेगाव येथे ७८ हजार ९९३ क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, शासनाच्या १६ जूनच्या निर्णयानुसार राज्यात ३१ मेपर्यंत १ लाख मेट्रिक टन तूर खरेदी करण्याचे स्पष्ट करण्यात आले, तसेच त्यानंतरही खरेदी केंद्रावर तूर शिल्लक राहणार असल्याने किंवा तूर खरेदीची मागणी होणार असल्याने केंद्र शासनाकडे मर्यादा वाढवून मागण्याचा मानस असल्याचे त्याच निर्णयात नमूदही करण्यात आले होते. त्यानंतर २६ मे रोजी शासनाने पुन्हा या संदर्भात निर्णय घेताना ३१ मे पर्यंतच्या मुदतीत खरेदी करण्यात येंणाऱ्या १ लाख टन तुरीची मर्यादा २६ मे रोजीच पूर्ण झाली. त्यामुळे २७ मेपासून बाजार हस्तक्षेप योजना (पीपीएस) अंतर्गत पुढे तूर खरेदी करण्यास मुभा देण्याची विनंती करण्यात आल्याचे स्पष्ट करीत पूर्वीच्या १ लाख टन तूर खरेदीची मर्यादा सोडून अतिरिक्त तूर खरेदी सुरू ठेवण्याचे जाहीर केले आणि त्याची माहिती सर्व जिल्हा सहायक निबंधकांपर्यंत पोहोचविण्यात आली; मात्र वाशिम येथे खरेदी सुरूच झाली नाही. ३१ मेपूर्वी टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर मोजण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. यासाठी १० जूनपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असून, तसे पत्र आपण सर्वच संबंधितांना पाठविले आहे. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानुसार ६ जून रोजी बैठक बाजार समित्यांच्या सचिवांसह इतर संबंधितांशी चर्चा के ली, तसेच जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना पत्रही पाठविले. -रमेश कटके, जिल्हा सहायक निबंधक वाशिम
नाफेडच्या खरेदीला वाशिमचे वावडे!
By admin | Updated: June 7, 2017 01:44 IST