लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून रुग्णवाहिकांसाठी मार्गावर विशेष दक्षता घेतली जाते; परंतु जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातच प्रवेश केल्यानंतर विविध मार्गांवर बेशिस्त वाहतुकीमुळे रुग्णवाहिकेला अडथळे येतात. त्यामुळे बऱ्याचदा रुग्णास उपचार मिळण्यास विलंब होतो. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानादरम्यानच हा प्रकार मंगळवारी पाहायला मिळाला.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १८ जानेवारीपासून रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. हे अभियान महिनाभर म्हणजेच १७ फेब्रुवारीपर्यंत राबविले जाणार असून, या अभियानात पर्यावरण सुरक्षा, अपघात सुरक्षा, वाहतूक नियमन आदींवर भर देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. त्याचे नियोजनही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)
बेशिस्त वाहतुकीचा रुग्णवाहिकेला अडथळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 11:03 IST