दापुरा (मानोरा, जि. वाशिम) : मानोरा तालुक्यातील दापुरा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना १६ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. येथील स्टेट बँकेची शाखा कारंजा-मानोरा रहदारीच्या रस्त्यावर असून या बँकेतच एटीएम मशिन बसविण्यात आली आहे. १५ मार्चच्या मध्यरात्री दीड ते अडीच वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी बँकेतील एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये त्यांना अपयश आले. दरम्यान, १६ मार्च रोजी घटना उजेडात आल्यानंतर शाखा प्रबंधक अभिनव दासगुप्ता यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुरेश दोनकलवार यांनी आपल्या सहकार्यांसह तत्काळ घटनास्थळ गाठले. याप्रसंगी पोहेकॉ भिमराव चव्हाण, दुर्गादास जाधव, नायब पोकॉ अंबादास राठोड, पोहेकॉं ज्ञानेश्वर राठोड, पोकॉं नितीन ठाकरे, जगदीश रॉय, पोलीस पाटील गजानन सोळंके उपस्थित होते. घटनास्थळावर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक कबुले, कुळमेथे, हेडकॉन्स्टेबल शेजूळकर, राखोंडे, ठाकूर यांचा समावेश होता. श्वान पथकही चोरट्यांचा माग काढण्यात अपयशी ठरले. स्टेट बँकेच्या शाखेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये चोरटे हातात टॉर्च घेवून दिसतात. परंतु चेहरे स्पष्ट दिसत नाही. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अज्ञात चोरटयाविरूद्ध अपराध कलम ४५७, ३८0, ५११ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By admin | Updated: March 17, 2015 01:04 IST