कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने ३० जूनपर्यंत विविध शासकीय विभागांमधील बदली प्रक्रियेस स्थगिती दिली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने २०२१-२२ या आर्थिक वर्षातील प्रशासकीय बदली प्रक्रियेस शासनाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत २६ ते २८ जुलै दरम्यान बदली प्रक्रिया राबविण्यात आली. जवळपास ५५ कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे; मात्र यामधील काही कर्मचारी अद्यापही बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याची माहिती आहे. काही कर्मचारी तालुकास्तरावर बदलीच्या ठिकाणात बदल करण्याच्या प्रयत्नात असल्याचीदेखील विश्वसनीय माहिती आहे. बदली झालेले कर्मचारी बदलीच्या ठिकाणी केव्हा रुजू होणार? याकडे इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
००००००
महसूल संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे रिसोड येथील एका कर्मचाऱ्याला एका वर्षातच सेवा संलग्न करून कारंजा तहसीलला परत रूजू केले. सेवा संलग्न केलेले आदेश रद्द करण्याबाबत महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. कारंजा तहसीलला काही शिपाई ८ ते ९ वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. मंगरुळपीर तहसीललादेखील काही कर्मचारी कनिष्ठ लिपिक ते अव्वल कारकून म्हणून अखंडित सेवा देत आहेत. समान काम-समान वागणूक व एक कार्यालय सहा वर्ष व एक टेबल ३ वर्षे असा आदेश पारीत करावा, अशी मागणीही डुकरे यांनी केली.