वाशिम : शेतकर्यांशी निगडीत असलेल्या कृषी यंत्रणेच्या तीनही विभागाची जबाबदारी वाशिम जिल्ह्यात प्रभारींच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. कृषी विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि आत्मा कार्यालयाचे प्रकल्प संचालक या तीनही विभाग प्रमुखांच्या बदल्या झाल्याने आणि नवीन विभागप्रमुख आले नसल्याने तीनही विभाग ह्यप्रभारीह्ण झाले आहेत. कृषीविषयक योजना पात्र शेतकर्यांपर्यंंंत पोहचविणे, हेक्टरनिहाय पीक नियोजन, आपतकालिन परिस्थितीत शेतकर्यांना मार्गदर्शन यासह विविध कामांची जबाबदारी कृषी विभागावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची जबाबदारी कृषी विकास अधिकारी, राज्याच्या कृषी विभागाची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि शासनाच्या आत्मा या संस्थेची जबाबदारी प्रकल्प संचालक दर्जाच्या अधिकार्यांवर सोपविण्यात आली आहे. कृषी विकास अधिकारी म्हणून चंद्रकांत सुर्यवंशी यांनी डिसेंबर २0११ पासून पदभार स्वीकारला होता. जिल्हा परिषदेचे ते १८ वे कृषी विकास अधिकारी होते. सव्वा तीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी विशेष घटक योजना, कृषीपंप जोडणी, सिंचन विहिर, सौरऊर्जा यासह कृषी विभागाच्या योजनांचा निधी वाढवून आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. जून महिन्यात त्यांची बदली कोल्हापूर जिल्हा परिषदेत समकक्ष पदावर झाली. सुर्यवंशी यांच्या जागेवर परभणी येथून पी.जी.कुळकर्णी यांची बदली जून महिन्यातच झाली होती. मात्र, कुळकर्णी अद्यापही रूजू झाले नसल्याने तुर्तास या पदाचा प्रभार जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) अभिजित देवगिरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. देवगिरकर यांनी शेतकर्यांना मोबाईलवर संदेश देणारी व्यवस्था कार्यान्वित केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांची एक महिन्यापूर्वी बदली झाली. तेव्हापासून सदर पद रिक्त आहे. चव्हाण यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र, या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा तक्रारी जिल्हाधिकार्यांकडे अनेकांनी केल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या तक्रारीमुळे चव्हाण यांचा कार्यकाळ विशेष गाजला आहे. आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा प्रभार उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक विजय चव्हाळे यांची जून महिन्यात बदली झाली. तेव्हापासून सदर पद रिक्त आहे. चव्हाळे यांनी शेतकरी बचत गटांची मोट बांधून शासनाच्या अनेक योजना जिल्ह्यात खेचून आणल्या आहेत. चव्हाळे यांच्या बदलीनंतर येथे अद्याप कुणीही रूजू झाले नाही. तुर्तास या पदाचा प्रभार आत्माचे उपसंचालक वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
कृषीचे तिन्ही विभाग ‘प्रभारी’
By admin | Updated: September 24, 2015 01:21 IST