प्राप्त माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कक्षाच्या चमूने जिल्हाभरात धडक देऊन पाहणी केली. यादरम्यान मंगरूळपीर तालुक्यातील ३८, वाशिम तालुक्यातील २४, कारंजा ५७, मानोरा ७१, मालेगाव २९ आणि रिसोड तालुक्यातील २५ नागरिकांना समज देऊन सोडण्यात आले; तर ७ लोकांकडून प्रत्येकी १२०० रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, पुढील महिन्यात बुधवारपासून मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. त्यानुषंगाने सहा तालुक्यांमध्ये पथकांचे गठण करून गावोगावी धडक दिली जाणार आहे. पहाटे ४ ते सकाळी ९ या वेळेत पथकातील कर्मचारी गावाच्या चोहोबाजूंनी पहारा देतील. यावेळी जो कोणी तावडीत सापडेल त्याला थेट पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे. १२०० रुपये दंडाची रक्कम भरल्यानंतरही संबंधिताची सुटका केली जाईल. याअंतर्गत शिरपूर, अनसिंग, शेलूबाजार, कामरगाव, रिठद, तोंडगाव, मेडशी, पोहरादेवी, शेंदुरजना, मांगूळझनक, राजाकिन्ही, भरजहागीर यासह तुलनेने अधिक लोकसंख्येची गावे टार्गेट केली जाणार आहेत, अशी माहिती स्वच्छता कक्षाचे राम श्रुंगारे यांनी दिली.
उघड्यावर जाणाऱ्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:23 IST