मंगरूळपीर: तालुक्यातील तपोवन ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ग्रामपंचायतचे रेकॉर्ड चोरून नेल्याची तक्रार ग्रामसचिव हर्षा उगले यांनी १७ जुलै रोजी मंगरूळपीर पोलिसात दाखल केली. १६ जुलै रोजी सायंकाळी ४.२८ वाजता ग्राम पंचायत कर्मचारी केशव सावळे यांनी फोनद्वारे संपर्क साधून ग्रामपंचायत कार्यालयाचे दोन्ही दरवाज्याचे व कपाटाचे कुलूप तोडून चोरी झाल्याची माहिती दिली, असे ग्रामसचिव हर्षा उगले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तेव्हा सायंकाळी ६.४५ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील रामहरी येवले, कर्मचारी केशव सावळे व गावकरी उपस्थित होते. त्यांचे समक्ष ग्रामपंचायतमधील फोडलेल्या लोखंडी कपाटातील रेकॉर्डची पाहणी केली असता त्यामध्ये नमुना ९ सन २0१४-१५, नमुना ६- २0१३-१४-१५ व २0१६ असे एकूण ३ रजिस्टर, नमुना १८ स्टॉक बुक सामान्य निधी फंडाचे २0१३-१४, नमुना १४, शेरे बुक, सन २0१४ मध्ये ई-क्लास जमीन सर्व्हे नं ३५ वरील अतिक्रमनबाबत केलेल्या पोलीस तक्रारीचे प्रत फाईल, घरकुल बाबत नविन यादी प्रस्ताव, गावठाण विस्तार करण्याबाबत प्रस्ताव दुय्यम फाइल, वार्षिक अहवाल फाइल २0१५-१६ असे वरील रेकॉर्ड चोरीला गेलेले आढळून आले. कपाटाचे कुलूप तोडल्यामुळे अंदाजे ७ ते ८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. चोरीला गेलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे रेकॉर्ड अतिशय महत्त्वाचे असून, सखोल तपास करून कारवाई करावी अशी मागणी हर्षा उगले यांनी केली.
ग्रामपंचायतच्या रेकॉर्डची चोरी
By admin | Updated: July 18, 2016 02:42 IST