गेल्या काही दिवसांपासून शहापूर येथे मोठ्या प्रमाणात हिवताप, सर्दी, खोकला या आजारांसह डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. जवळपास २० ते ३० ग्रामस्थांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शहापूर येथील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब लक्षात घेत ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन शहापूर येथील बहुतांश वॉर्डांमध्ये धूरफवारणी केली आहे. ग्रामपंचायत अंतर्गत सर्व गावात तत्काळ आवश्यक उपाययोजना व फवारणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावेळी जि. प. सदस्या कांचन मोरे, सरपंच साहेबराव भगत, ग्रामविकास अधिकारी पंडित राठोड, ग्रामपंचायत सदस्य, वंदना कांबळे, शशिकला हिवाळे, एकनाथ राऊत तसेच गावकरी उपस्थित होते.
--------------
कोरोना नियंत्रणात, साथीच्या आजारांत वाढ
मंगरुळपीर तालुक्यात जांब ग्रामपंचायत अंतर्गत सर्वच गावांत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना आता डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांसह, मलेरियासारख्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. शिवाय विषमज्वराच्या आजारांचे रुग्णही वाढत आहेत. अनेक वॉर्डांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आजारांनी तोंड वर काढले आहे. या आजारांमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
----------
कोट: जांब ग्रामपंचायत अंतर्गत ताप, सर्दी खोकल्यासह मलेरिया आणि डेंग्यूसदृश आजाराचे प्रमाण वाढत आहे. या पृष्ठभूमीवर ग्रामस्थांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी सर्वच गावांत धूरफवारणीची मोहीम राबविली जात आहे. तालुका आरोग्य विभागाशी संपर्क साधून गावात आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्याची मागणीही करणार आहे.
- साहेबराव भगत,
सरपंच, गट ग्रामपंचायत जांब