वाशिम : शहरांसह ग्रामीण भागात कुठलीही अनुचित घटना घडल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिसांना मिळाल्यास मोठा अनर्थ टळू शकतो तथा गुन्हेगार फरार होण्यापूर्वीच त्याला जेरबंद करणे शक्य होऊ शकते; मात्र जिल्ह्यातील १३ पैकी आठ पोलिस ठाण्यांचे दूरध्वनी बंद पडले आहेत. परिणामी, तक्रारींचा ओघ आपसूकच कमी होण्यासह गुन्ह्यांची माहिती वेळेत मिळणे अवघड झाले आहे.
जिल्ह्याची एकूण लोकसंख्या दहा लाखांपेक्षा अधिक असून, ७९३ गावे आहेत. सहा शहरांमध्ये सहा; तर ग्रामीण भागात सात अशा १३ पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत केवळ १५०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर महिला, मुली, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. तथापि, तुलनेने कमी मनुष्यबळ असल्याने दैनंदिन घडणाऱ्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करून त्याचा पाठपुरावा करणे, गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलिसांना अपेक्षित यश मिळणे कठीण झाले आहे. अशातच जिल्ह्यातील १३ पोलीस ठाण्यांपैकी केवळ वाशिम शहर, वाशिम ग्रामीण, कारंजा शहर, रिसोड आणि अनसिंग या पाच पोलीस ठाण्यांचा दूरध्वनी सुरू असल्याचे; तर मालेगाव, शिरपूर जैन, मंगरूळपीर, आसेगाव, जऊळका रेल्वे, मानोरा, धनज बु. आणि कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद पडल्याचे आढळून आले. यातील काही दूरध्वनी देयक अदा न केल्याने आणि काही दूरध्वनी तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याचे सांगण्यात येत आहे.
.........................
बॉक्स :
दूरवरच्या गावांमधील घटना दुर्लक्षित
जिल्ह्यात ७९३ गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी १३ पोलीस ठाणे कार्यान्वित आहेत. यामुळे साहजिकच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५०पेक्षा अधिक गावांचा समावेश होतो. ठाण्यांमधील दूरध्वनीच बंद राहत असल्याने पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या; पण दूरवर असणाऱ्या गावांमधील नागरिकांना सभोवताल घडणाऱ्या घटनांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविण्यात अडचण निर्माण झाली आहे. अशा घटनांकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे.
........................
जिल्ह्यात कार्यान्वित पोलीस ठाणे
१३
दूरध्वनी सुरू असलेली ठाणी
५
दूरध्वनी बंद असलेली ठाणी
८
.......................
बॉक्स :
तालुका मुख्यालयांचेही दूरध्वनी बंदच
जिल्ह्यातील दूरध्वनी बंद असलेल्या आठ पोलीस ठाण्यांमध्ये तालुका मुख्यालयी असलेल्या ठाण्यांचाही समावेश आहे. त्यात प्रामुख्याने मालेगाव, मंगरूळपीर आणि मानोरा येथील पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद असल्याचे आढळून आले.
...................
कोट :
जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना देण्यात आलेले दूरध्वनी क्रमांक नियमित सुरू राहणे आवश्यक आहे; मात्र उद्भवणारी तांत्रिक अडचण विनाविलंब निकाली काढण्याबाबत भारत संचार निगम लि.कडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. लवकरच सर्व पोलीस ठाण्यांचे दूरध्वनी सुरू करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम