वाशिम : अंगणवाडीतील पोषण आहार व त्यासंबंधीची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी विकसित केलेल्या ‘पोषण ट्रॅकर अॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश नसल्याने अंगणवाडी सेविकांना सर्व माहिती इंग्रजीमधून भरण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे एकतर इंग्रजी शिकवा किंवा या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, असा सूर राज्यभरातील अंगणवाडी सेविकांमधून उमटत आहे. या अॅपवर इंग्रजी व हिंदी या दोनच भाषांचा समावेश आहे. जिल्ह्यात १,०९२ अंगणवाडी केंद्र असून, जवळपास १,०७६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत.
०००००००००००००००००
मोबाईलची अडचण वेगळीच!
अंगणवाडी सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्मार्टफोन दिले. मोबाईल न चालणे, रेंज न मिळणे, वारंवार हँग होणे आदी कारणांमुळेदेखील ‘पोषण ट्रॅकर अॅप’मध्ये माहिती भरताना अंगणवाडी सेविकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात रेंज न मिळणे व मोबाईल हँग होणे ही समस्या बहुतांश अंगणवाडी सेविकांना भेडसावत आहे.
००००००००००००
जिल्ह्यातील अंगणवाड्या १,०९२
एकूण अंगणवाडी सेविका १,०७६
००००००००००००००
पोषण ट्रॅकरवरील कामे!
केंद्र शासनाच्यावतीने अंगणवाडी सेविकांना पोषण आहाराशी संबंधित माहिती भरण्यासाठी ‘पोषण ट्रॅकर अॅप’ उपलब्ध करून दिले आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाईलद्वारे पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक आहार, गृहभेट नियोजन, वाढ देखरेख, शिधावाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन मासिक प्रगती अहवाल याबाबतची सर्व माहिती संगणकीय प्रणालीद्वारे भरण्यात येते.
०००००००००००००
कोट
जिल्ह्यात १,०९२ अंगणवाडी आहेत. ‘पोषण ट्रॅकर अॅप’मध्ये इंग्रजी व हिंदी या दोन भाषेचा समावेश असून, यामध्ये मराठी भाषेचा समावेश करावा अशी मागणी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांची आहे. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती आहे.
- संजय जोल्हे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद वाशिम
०००००००००
आम्हाला इंग्रजी कशी येईल?
कोट
मोबाईल येण्यापूर्वी पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक आहार, गृहभेट नियोजन यासह विविध प्रकारच्या नोंदी या ऑफलाईन पद्धतीने नोंदवहीत ठेवण्यात येत होत्या. त्यानंतर मोबाईल आले. ‘पोषण ट्रॅकर अॅप’मध्ये मराठी भाषा नसल्याने सर्व माहिती इंग्रजीत भरावी लागते. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते.
- श्वेता देवळे, अंगणवाडी सेविका
..................
पोषण ट्रॅकर अॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, अशी मागणी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी केली आहे. याबाबत विभागीय आयुक्त स्तरावरही अंगणवाडी सेविकांनी मागणी केली. अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश झाला तर सर्व माहिती भरणे सुलभ होईल.
- बेबीबाई आसरे, अंगणवाडी सेविका