नंदकिशोर नारे / वाशिम : वादळाचा तडाखा बसलेल्या मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा गाव उद्ध्वस्त झाले. अनेक जण जखमी झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी घडली. जखमींवर उपचारासाठी वेळेवर न पोहचणे व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीन कर्मचारी निलंबित करण्यात आले तसेच शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या खंडाळा उपकेंद्रावरील तीन कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य संचालकाकडे पाठविण्यात आला आहे. ढोरखेडाच्या पाहणीसाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा ताफा १८ सप्टेंबर रोजी पोहोचला होता. या घटनेत जखमी झालेल्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला तसेच सात जखमींवर उपचार झाले नसल्याची बाब ग्रामस्थांनी मांडली होती. याची दखल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेऊन तीन कर्मचार्यांना तातडीने (१९ सप्टेंबर) रोजी निलंबित केले. यामध्ये आरोग्य सहायक गजानन तायडे, आरोग्यसेविका एम.आर. जाटे, रुग्णवाहिका चालक ए.एस गायकवाड यांचा समावेश आहे. तीनही कर्मचार्यांना निलंबनपत्र २१ सप्टेंबर रोजी हाती आल्याने खळबळ माजली आहे. खंडाळा उपकेंद्रात मुख्यालयी हजर न राहल्याप्रकरणी तीन कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये आरोग्यसेविका ए.आर. कर्हाडे, आरोग्यसेवक बी.जी. शिंदे व कंत्राटी आरोग्यसेविका प्रमिला अवचार यांचा समावेश आहे. शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सचिन महाजन हेसुद्धा आरोग्य केंद्रात हजर नसल्याने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. वादळी वारा व पावसामुळे ढोरखेडातील अनेक घरांची पडझड आणि सात-आठ नागरिक जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. डोक्याला पत्र्याचा मार लागल्याने सखुबाई सावळे या महिलेचा मृत्यू झाला. अनेक मान्यवरांनी भेट दिली तेव्हा ग्रामस्थांनी आपली आपबीती कळविली. वेळेवर धावून न आलेल्या अधिकारी-कर्मचार्यांबाबत चिड व्यक्त होत होती. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा जखमींवर उपचाराकरिता शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक वेळेवर न पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केला गेला होता. मंत्री, अधिकारी व पदाधिकारी यांनी भेट दिली तेव्हा ग्रामस्थांनी याबाबत सांगितले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तर चक्क दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशा सूचना केल्या होत्या. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका, आरोग्य सहायक व रुग्णवाहिकेचा चालक यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या निलंबनाचा प्रस्तावही आरोग्य संचालक (मुंबई) यांच्याकडे पाठविण्यात आला असल्याने, त्यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार दिसून येत आहे.
आरोग्य केंद्राचे तीन कर्मचारी निलंबित
By admin | Updated: September 22, 2015 01:57 IST