वाशिम : रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता केल्याच्या आरोपावरून मालेगाव पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी आर. एस. कंकाळ आणि सहाय्यक लेखाधिकारी एस. एम. इंगळे यांना आज २७ फेब्रुवारीला मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी सेवेतून तडकाफडकी निलंबीत केले. विविध योजनांच्या अंमलबजावणीत मालेगाव पंचायत समिती ही सुरवातीपासुनच पिछाडीवरच राहिली आहे. आज या बाबीची किंमत त्या पंचायत समितीला चुकवावी लागली. विशेषत: महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात मोठया प्रमाणात अनियमितता झाली असल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी याला जबाबदार असणार्या दोन महत्वाच्या अधिकार्यांना सेवेतुन तात्काळ निलंबित केले. रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता करणे यासोबतच स्वच्छ भारत मिशनच्या कामात अत्यल्प प्रगती असणे, ग्रामपंचायत कर वसुली व ई पंचायतच्या कामात दुर्लक्ष करणे आणि वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे असे आरोप निलंबीत करण्यात आलेल्या अधिकार्यांवर ठेवण्यात आले आहेत. तसेच या अपहरणास कारणीभूत सहा. कार्यक्रम अधिकारी आर. आर. पठाण व डाटा एंट्री ऑपरेटर दिपक सावळे यांना कार्यमुक्त करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.
प्रभारी गटविकास अधिकारी आणि सहाय्यक लेखाधिकारी निलंबित
By admin | Updated: February 28, 2015 00:59 IST