वाशिम : वेश्याव्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला व त्यांच्यावर विसंबून असलेल्या बालकांची कोविड-१९ मुळे उपासमार सुरू होती. दरम्यान, २६ नोव्हेंबर २०२० रोजी पारित शासननिर्णयास अधीन राहून जिल्ह्यातील ७२ महिला व १२ बालकांना कोरडे अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या बँक खात्यात ११.७० लाखांची रक्कम ‘डीबीटी’व्दारे जमा करण्यात आली. यामुळे संबंधितांना मोठा दिलासा मिळाला.
सर्वोच्च न्यायालयात दाखल क्रिमिनल अपील क्र. १३५/२०१० (बुधादेव करमास्कर विरुद्ध स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल व इतर) निकाली काढताना वेश्याव्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड-१९ च्या प्रादुर्भाव काळात आर्थिक साहाय्य देण्यासंबंधी राज्य शासनाला निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने २६ नोव्हेंबर २०२० रोजी शासननिर्णय पारित करून राज्यभरातील ३० हजार ९०१ महिला आणि त्यांच्यावर विसंबून असलेल्या ६ हजार ४५१ बालकांना अर्थसाहाय्य करण्यासाठी ५१ कोटी १८ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला होता. त्यात वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला ११ लाख ७० हजार रुपयांचा निधी आला होता.
दरम्यान, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पीडिता आणि वेश्या व्यवसाय करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोरडे अन्नधान्य व प्रतिमाह प्रतिमहिला ५ हजार रुपये तसेच ज्या महिलांची मुले शाळेत जातात, त्यांना प्रतिमाह २५०० रुपये अतिरिक्त रक्कम कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह न धरता जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मान्यतेने बँक खात्यात जमा करण्यात आले. यामुळे अडचणीच्या काळात संबंधित महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे..
...........................
१०९ महिलांना वितरित झाले कोरडे अन्नधान्य
शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ५९ महिला व ३८ मुलांसाठी अनुदान तसेच १०९ महिलांना प्रत्येकी १४.२८ क्विंटल गहू, १२.४२ क्विंटल तांदूळ असे कोरडे अन्नधान्य वितरित करण्यात आले. प्राप्त अर्जानुसार आणखी १५ लाख ६७ हजारांचा निधी आवश्यक असून तशी मागणी शासनाकडे नोंदविण्यात आलेली आहे.
.................................
कोट :
२६ नोव्हेंबर २०२० च्या शासननिर्णयानुसार जिल्ह्यात वेश्याव्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला व त्यांच्यावर विसंबून असलेल्या बालकांच्या खात्यात ११.७० लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे. याशिवाय संबंधितांना कोरडे अन्नधान्यही वितरित करण्यात आले आहे.
- सुभाष राठोड
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, वाशिम