कारंजा-मानोरा मार्गादरम्यान वाहणाऱ्या अडाण नदीवर सुरळीत वाहतुकीसाठी जवळपास ४५ वर्षांपूर्वी भव्य पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. हा पूल ४० फूट उंच आणि जवळपास १०० मीटर लांब आहे.
शनिवारी इंझोरी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस जोरदार बरसला. त्यामुळे सर्वत्र पावसाचे पाणी साचले. त्यामधे कारंजा ते मानोरा मार्गावर असणाऱ्या अडाण नदीवरील पुलावर गुडघाभर पाणी साचले. त्याच पाण्यामधून शेकडो वाहनचालकांना मार्गक्रमण करत आपली वाहने काढण्याची कसरत करावी लागली. यामध्ये अपघाताची भीती दिसत होती. या सर्व बाबींकडे सा. बा. विभागाचे मात्र दुर्लक्षित धोरण दिसत आहे. कारण या १०० मीटर लांब पुलावर मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी टाकलेल्या केबल लाईनमुळे पुलावर आधीपासून असलेल्या नाल्या संपूर्णपणे बंद झाल्या. परिणामी, या पुलावर पावसाचे जमा झालेले पाणी वाहणार कुठून? असा प्रश्न निर्माण झाला.