स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने जिल्ह्यातील ओबीसी गटातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. रद्द झालेल्या जागेवर १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. यामध्ये शिरपूर भाग क्रमांक दोन पंचायत समिती गणासाठीसुध्दा निवडणूक होणार आहे. निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून सलीम रेघीवाले यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. त्यांच्याऐवजी सलीम गवळी यांचे भाऊ इम्रान परसुवाले यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली. तर भारतीय जनता पक्षाच्यावतीने विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कलीम रेघीवाले यांनी उमेदवारी दाखल केली. यासह वंचित व जनविकास आघाडीकडून संदीप त्र्यंबक देशमुख, तसेच सलीम परसुवाले व बाबू परसुवाले यांच्यासह एकूण पाच जणांनी ५ जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीमध्ये वार्ड नं. दोन, तीन, सहामधील ३,४०० पुरुष, २,९८२ महिला मतदारांसह एकूण ६,३८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ५ उमेदवारांपैकी किमान एक किंवा दोन उमेदवार १२ जुलै रोजी उमेदवारी नक्की मागे घेतील, असे बाेलले जात आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी महाआघाडीचे इम्रान परसुवाले, भाजपाचे कलीम रेघीवाले व वंचित व जनविकास आघाडीचे संदीप देशमुख यांच्यातच खरी लढत होईल. सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये जे गट एकमेकांच्या विरोधात सर्व ताकदीनिशी लढले, ते गट पंचायत समिती निवडणूक एकत्रितरित्या लढत आहेत.
शिरपूर भाग दोन पंचायत समिती गणात, काँग्रेस, भाजप व वंचित जनविकास आघाडीत लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:27 IST