मंगरूळपीर ....शहरालगत असलेल्या जांब गट ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या शहापूर, सोनखासमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईशी सामना करावा लागत असून, यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ पूर्णतः त्रस्त झाले आहेत. पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी येथील महिलांनी २७ मे रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद आहे की, जांब गट ग्रामपंचायत अंतर्गत शहापूर व सोनखास ही दोन मोठी गावे येत असून, या दोन्हीही गावांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात अखेर शासनामार्फत टँकरची व्यवस्था करण्यात येते. मात्र, यावर्षी उन्हाळा संपत आला तरीही पाणी टँकर उपलब्ध करून दिले नाही. परिणामी ग्रामस्थांना पाण्याअभावी अनेक संकटाशी सामना करावा लागत आहे. अनेकांना पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे, तर काहींना पाणी टँकर विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. आधीच कडक निर्बंधांमुळे सर्व व्यवसाय, कामे ठप्प झाल्याने आर्थिक परिस्थिती डबघाईस आली असताना अशा परिस्थितीमध्ये टँकरसाठी पैसे कुठून आणावेत, हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. शहापूर ग्रामपंचायतअंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था आहे; पंरतु ती कुचकामी ठरली आहे. अनेकांना या नळाचे पाणीच मिळत नाही, ही व्यवस्था फक्त धनदांडग्या लोकांसाठी आहे. या धनदांडग्यांनी नळाच्या तोटीला इलेक्ट्रिक मोटारी बसविल्या आहेत. त्यामुळे या नळाचे पाणी गरीब व गरजू लोकांच्या घरापर्यंत पोहोचतच नाही व या भागातील बहुतांश हातपंप बंद पडले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत अनेकदा ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर निवेदन दिली आहेत. मात्र, कुठल्याच तक्रारीची दखल घेतली नाही. पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे ही बाब ग्रामस्थांवर अन्याय करणारी आहे. या पाणीपुरवठा व्यवस्थेचा स्पॉट पंचनामा करून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर ३५ महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.