कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात १७ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्रीपासून जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शण्मुगराजन एस. यांनी बुधवारी जारी केला.
या आदेशानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरूपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका या ठिकाणी केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी राहील. पुढील आदेशापर्यंत मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या बाबत स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही, याबाबत स्थानिक प्रशासन (नगर परिषद/नगर पंचायत /ग्राम पंचायत) यांनी दक्षता घेऊन व आवश्यक पथकाचे गठन करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्यांच्या स्तरावरून गर्दीस प्रतिबंध करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. या कालावधीत ऑनलाईन, दूरस्थ शिक्षण यांना परवानगी राहणार आहे.