वाशिम, दि. १८- दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळण्यासाठी खासगी शाळांना ऑनलाइन नोंदणी बंधनकारक केली असून, अशी नोंदणी करण्यासाठी शाळांची लगबग सुरू झाली. ३ फेब्रुवारीपर्यंंत नोंदणी होणार असून, त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून पालकांना ऑनलाइन प्रवेश अर्ज करावे लागणार आहेत.शिक्षण हक्क कायद्याने (राईट टू एज्युकेशन म्हणजेच आरटीई) दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांंना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल, अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीई अंतर्गत जिल्ह्यात जवळपास ७0 नामांकित खासगी शाळा येतात. मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी संबंधित शाळांना ऑनलाइन नोंदणी करून इत्थंभूत माहिती सादर करावी लागते. शाळा नोंदणीसाठी १६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी असा कालावधी निश्चित केला आहे. या कालावधीत पात्र शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. पात्र शाळांना २५ टक्के प्रवेशाकरिता प्रवेश स्तर नोंदवावा लागणार आहे. पात्र असणार्या शाळांची यादी प्रथमत: निश्चित केली जाणार आहे. या शाळांची यादी व संपूर्ण ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना शासनाने शिक्षण विभागाला दिलेल्या आहेत. तसेच ऑनलाइन प्रक्रियेत शाळेने केलेल्या नोंदणीची पडताळणी करण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षणाधिकार्यांवर सोपविली आहे. ज्या शाळा २५ टक्के प्रवेशाकरिता पात्र आहेत; परंतु नोंदणी करीत नाही किंवा प्रवेश स्तरावरील एकूण क्षमतेच्या २५ टक्के जागा उपलब्ध करून देणार नाहीत, अशा शाळांची तत्काळ मान्यता काढण्याबाबत तसेच नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई काढण्याबाबत नोटिस देण्याची जबाबदारीदेखील यावर्षीपासून शिक्षणाधिकार्यांवर सोपविली आहे. वाशिम जिल्ह्यात शाळांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, शाळा व्यवस्थापनाची लवकरच बैठक घेऊन सविस्तर माहिती देण्यात येणार आहे, असे प्रभारी शिक्षणाधिकारी तुरणकर यांनी सांगितले.
नोंदणीसाठी शाळांची लगबग!
By admin | Updated: January 19, 2017 02:26 IST