रिसोड : येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक औषधी व इंजेक्शनचा तुटवडा आहे; शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचाही अनुशेष कायम आहे. परिणामी, रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात गैरसोय येत आहेत.गत सहा महिन्यांपासून औषध निर्माता अधिकारी हे पद रिक्त असल्याने त्यांचे जागेवर इतर कर्मचाऱ्यांना बसवून औषधी वाटपाचे काम सुरु आहे. तीन वर्षापासून एक्सरे मशीन बंद पडल्याने क्ष -किरण कक्ष नेहमी बंद असतो. ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधिक्षकासह दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. खोकल्यांचे औषध व अॅण्टीरॅबीज (श्वान दंश) लस गेल्या कित्येक दिवसांपासून उपलब्ध नसल्याने श्वानदंश झालेल्या रुग्णांना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घ्यावी लागते. ग्रामीण रुग्णालय परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा म्हणून बोअरवेल घेण्यात आला. बोअरची जलपातळी खोल गेल्याने मोजकेच पाणी येत आहे. परिणामी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वापरासाठी लागणारे पाणी मिळत नाही. अन्य ठिकाणावरून रुग्णांच्या नातेवाईकांना पाणी आणावे लागत आहे. रुग्णालय परिसरात असलेले शवविच्छेदन गृह मुलभूत सुविधेपासून वंचित आहे. या शवविच्छेदन गृहापर्यंत रस्ता नसल्याने रुग्णवाहिका नेता येत नाही. शवविच्छेदनासाठी आणलेले प्रेत स्ट्रेचरवर टाकुन न्यावे लागते. शवविच्छेदन गृहातील विज क नेक्शन बंद असल्याने रात्री अंधार राहतो. त्या कारणाने रात्री शवविच्छेदन होत नाही. सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे मृतकाचे शवविच्छेदन केल्यानंतर पाणी आवश्यक असते. परंतु या ठिकाणी स्वतंत्र्य अथवा बोअरची कोणतीही सुविधा नसल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दुरवरुन पाणी आणावे लागते. यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर चोपडे म्हणाले की, वैद्यकीय अधिक्षकांसह वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात यापुर्वीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव सुध्दा शासनाकडे पाठविला आहे. अधिकारी, क र्मचारी व आवश्यक औषधी उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेकडून काम करुन घेतांना मोठी कसरत करावी लागत आहे, असे डॉ.चोपडे म्हणाले.
ग्रामीण रुग्णालयात औषधींचा तुटवडा; डॉक्टरांचाही अनुशेष !
By admin | Updated: April 20, 2017 15:57 IST