वाशिम : सध्या गावरान आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांची पुरेशा प्रमाणात वाढदेखील झालेली नाही. दुसरीकडे मात्र केसर, बादाम, लालबाग आदी नावांनी ओळखल्या जाणारे आंबे पिकलेल्या अवस्थेत बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत; मात्र सावधान! हे आंबे नैसर्गिकरीत्या नव्हे; तर ‘कार्बाइड’ या घातक रसायनाचा वापर करून अनैसर्गिक पद्धतीने पिकविलेली आहेत. ती सेवनात आल्यास आरोग्यावर विपरित परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे शक्यतोवर पूर्वहंगामी आंब्यांचा मोह टाळलेलाच बरा, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे. जिल्ह्यातील वाशिमसह इतर पाच तालुके आणि तुलनेने अधिक लोकसंख्या असलेल्या खेड्यांमध्ये सध्या सर्रास पिकलेल्या आंब्यांची विक्री केली जात आहे; मात्र वरकरणी हे आंबे आकर्षक दिसत असले तरी विशिष्ट प्रकारच्या ‘कार्बाइड’ या घातक रसायनाचा वापर करून ती पिकविण्यात येत असल्याने त्याला चव राहत नसल्याचे स्पष्ट होत आहे. याशिवाय अशा प्रकारचे आंबे सेवनात आल्याने आरोग्यविषयक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.घातक रसायनाच्या वापरामुळे फळांमध्ये अनैसर्गिकरीत्या वाढ होऊन पिकविण्याची प्रक्रिया लवकर होते. यामुळे मात्र फळातील जीवनसत्व कमी होऊन ती बेचव होतात. याशिवाय पोटदुखी, मळमळ, उलटी यारसारखे त्रास संभवू शकतात.- डॉ. अरूण बिबेकर, ह्रदयरोगतज्ज्ञ, वाशिम
घातक रसायनांनी पिकविलेल्या आंब्यांची जिल्ह्यात विक्री!
By admin | Updated: April 13, 2017 02:13 IST