०००००
कृषिपंप जोडणी रखडली
वाशिम : रिसोड तालुक्यात कृषिपंपासाठी अर्ज करून एका वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना कृषिपंप जोडणी मिळालेली नाही. याकडे ‘महावितरण’ने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी शनिवारी केली आहे.
००००
अनसिंग येथे तीन कोरोना रुग्ण
वाशिम : वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३० मे रोजी पॉझिटिव्ह आला. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
०००
खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास
वाशिम : मालेगाव-वाशिम रस्त्यावर वाशिमपासून हाकेच्या अंतरावर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना चालकांची दमछाक होत आहे.
०००००
घरकुल अनुदान रखडले
वाशिम : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचे अनुदान केनवड परिसरातील जवळपास ५० लाभार्थ्यांना मिळाले नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी लाभार्थ्यांनी शनिवारी केली आहे.
००००००००
किन्हीराजा परिसरात विजेचा लपंडाव
वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा परिसरातील गावांमध्ये विद्युत पुरवठा अधून-मधून खंडित होत आहे. वादळ वारा किंवा पाऊस आला की वीजपुरवठा गुल होतो. त्यामुळे गावकऱ्यांची गैरसोय होत आहे. याकडे ‘महावितरण’च्या संबंधित अभियंत्यांनी लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी रविवारी केली आहे.
00
रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित
वाशिम : रोजगार हमी योजनेत कार्यरत ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. मानधनात वाढ नाही तसेच दरमहा पहिल्या आठवड्यात मानधनही मिळत नाही. मालेगाव तालुक्यात दोन महिन्यांचे मानधन प्रलंबित आहे.
00
तोंडगाव परिसरात स्वच्छतेचा बोजवारा
वाशिम : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत २०१९ मध्ये जनजागृती करत उघड्यावरील शौचास जाणाऱ्यांवर कारवाई केली होती. यंदा नागरिक मोठ्या संख्येने उघड्यावर शौचास जात असल्याने तोंडगाव परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे.