वाशिम : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल ७ मे रोजी अकोला येथे मतमोजणीनंतर जाहीर होणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी जिल्ह्यातील ३५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यापैकी २३ जणांनी माघार घेतल्याने आणि दोन जागा अविरोध झाल्याने मालेगाव, वाशिम, कारंजा व मानोरा या चार तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघांत निवडणूक झाली. ५ मे रोजी ना.ना. मुंदडा विद्यालय (मालेगाव), श्री शिवाजी विद्यालय (वाशिम), विद्याभारती विद्यालय (कारंजा लाड) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (वसंतनगर, मानोरा) या चार केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. मानोरा तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात ३३, कारंजा ५0, वाशिम ९८, तर मालेगाव तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात ८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मानोरा तालुक्यात एका जागेकरिता विद्यमान संचालक सुरेश गावंडे व उमेश ठाकरे हे एकमेकाविरुद्ध आमनेसामने उभे ठाकले होते. ही निवडणूक माजी मंत्री सुभाष ठाकरे व माजी आमदार प्रकाश डहाके यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. मालेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप जाधव आणि विद्यमान संचालक प्रकाश पाटील कुटे यांच्यात टस्सल झाली. कारंजामध्येही विजय काळे व श्रीधर कानकिरड यांच्यात लढत झाली. यामध्ये कोण बाजी मारतो, हे मतमोजणीनं तर ७ मे रोजी स्पष्ट होईल.
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा आज निकाल
By admin | Updated: May 7, 2015 01:05 IST