विवेक चांदूरकर /वाशिमदुष्काळग्रस्त भागात कृषी महसुलाची वसुली करण्यावर बंदी असते; मात्र जिल्ह्यात पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्यावरही शासनाने दुष्काळ उशिरा जाहीर केला. त्यामुळे दुष्काळ असल्यावरही जिल्ह्यात १३ लाख ६१ हजार रुपयांच्या कृषी महसुलाची वसुली करण्यात आली. जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे; मात्र शासनाने यावर्षीपासून दुष्काळ जाहीर करण्याकरिता विशेष निकष लावले. दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्ह्यात जून व जुलै महिन्यातील सरासरीच्या ५0 टक्के पाऊस व्हायला हवा. तसेच जून व जुलै महिन्यामध्ये ५0 टक्केच पेरणी व्हायला हवी. यासोबतच पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी व्हावी. या निकषांमध्ये वाशिम जिल्हा बसत नसल्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर केला नाही. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र डिसेंबर महिन्यापूर्वीच दुष्काळ जाहीर करण्यात आला. यामध्ये बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील काही गावांचा समावेश होता. त्यानंतर न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस वाशिम जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत दोन महिने जिल्ह्यात उशिरा दुष्काळ जाहीर करण्यात आला. यादरम्यान जिल्ह्यात महसूल वसुली जोमात करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने तलाठी, ग्रामसेवकांच्या माध्यमातून मार्च अखेर सर्वच गावांमध्ये महसूल व शेतसार्याची वसुली केली. अमरावती विभागात पाचही जिल्ह्यांपैकी सर्वात जास्त वसुली वाशिम जिल्ह्यात करण्यात आली. दिलेल्या लक्ष्यापेक्षाही जास्त १0९ टक्के महसुलाची वसुली करण्यात आली. जिल्ह्यात एकूण जमिनीचा शेतसारा १३ लाख ६१ हजार रुपये आहे. या शेतसार्याची वसुली करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त अन्य जिल्ह्यांप्रमाणे आधीच दुष्काळ जाहीर झाला असता, तर शेतकर्यांकडून शेतसारा वसूल करण्यात आला नसता. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अनेक सुविधा शेतकर्यांना तसेच नागरिकांना मिळत असतात; मात्र शासनाने उशिरा दुष्काळ जाहीर केल्यामुळे मिळणार्या लाभापासून जिल्ह्यातील शेतकर्यांना वंचित राहावे लागले.
शेतसा-याची वसुली!
By admin | Updated: April 13, 2016 01:21 IST