वाशिम : वरिष्ठ विभागाकडून आवश्यक ते ‘फॉर्म’ वेळेत प्राप्त न झाल्याने जिल्ह्यात एका महिन्याच्या विलंबाने मार्चपासून अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम सुरू झाली आहे. पुरवठा विभागाने परस्पर निर्णय लादल्याने तलाठ्यांचेदेखील या मोहिमेस सहकार्य मिळण्याची शक्यता कमी असल्याने मनुष्यबळ शोधण्याची वेळ पुरवठा विभागावर येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश, २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरिता दरवर्षी विशेष शोधमोहीम राबविण्यात येते. बी.पी.एल., अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्वप्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी यंदा १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम राबविण्याचे निर्देश पुरवठा विभागाने २८ जानेवारीला जिल्हास्तरीय यंत्रणेला दिले होते. परंतु, वरिष्ठ स्तरावरून विहीत नमुन्यातील फॉर्म फेब्रुवारी महिन्यात मिळाले नसल्याने ही मोहीम मार्च महिन्यापासून सुरू करण्याची वेळ पुरवठा विभागावर आली. अजूनही विहीत नमुन्यातील फॉर्मचा १०० टक्के पुरवठा विभागाला मिळाले नसल्याची माहिती आहे. जिल्हास्तरीय यंत्रणेला प्राप्त झालेले फॉर्म तालुकास्तरीय यंत्रणेकडे पाठविण्यात आले असून, जेथे फॉर्म मिळाले तेथे मोहीम सुरू झाली तर जेथे फॉर्म मिळाले नाहीत तेथे अद्याप मोहीम सुरू झालेली नाही. दुसरीकडे पुरवठा विभागाने महसूल विभागाची परवानगी न घेताच या मोहिमेच्या कामात तलाठ्यांना गृहित धरल्याने तलाठ्यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेत मोहिमेस सहकार्य न करण्याची भूमिका घेतली. तलाठ्यांच्या या भूमिकेवर तोडगा न निघाल्यास मनुष्यबळ शोधण्याची वेळ पुरवठा विभागाला येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. फॉर्म मिळण्यास विलंब, अपुरे मनुष्यबळ यामुळे जिल्ह्यात शिधापत्रिका शोधमोहीमच अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बॉक्स
अशा आहेत शिधापत्रिका
शुभ्र९,४७६
अंत्योदय४८,९७०
प्राधान्य कुटुंब१,८१,१०९
केशरी१४,७३९