भर जहागीर : येथून जवळच असलेल्या किनखेडा येथील वारकरी संप्रदायाचे पाईक ह.भ.प. ज्ञानबाराव भगवंतराव अवचार यांचे ८ मे रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या रक्षा विसर्जन कार्यक्रम १० मे रोजी त्यांच्या शेतात आयोजित करण्यात आला. यावेळी राख व अस्ती पाण्यात विसर्जित न करता शेतातच पाच खड्डे करून त्यात राख टाकण्यात आली व वृक्षारोपण करण्यात आले. यामाध्यमातून पारंपरिक पद्धतीला फाटा देणाऱ्या प्रा. राजेश अवचार यांचे सर्वत्र काैतुक होत आहे.
मृतकावर अंत्यसंस्कार केल्यानंतर लाकडाची होणारी राख आणि अस्ती नदीच्या वाहत्या पाण्यात टाकण्याची परंपरा पूर्वापार पासून चालत आलेली आहे ; मात्र रुढी, परंपरेला फाटा देत ज्ञानबाराव अवचार यांचे पुत्र राजेश अवचार यांनी राख व अस्तींचे विसर्जन पाण्यात करण्याऐवजी शेतातच पाच खड्डे करून त्यात ते टाकून वृक्षारोपण करण्याची इच्छा उपस्थितांसमोर व्यक्त केली. त्यास सर्वांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्वांसमक्ष हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ज्ञानबाराव यांचा मोठा मुलगा गजानन आणि सून मंगलताई अवचार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदर उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. यावेळी माजी जि.प. सदस्य स्वप्निल सरनाईक, पंजाबराव अवचार, भागवतराव अवचार, विजयराव अवचार, बंडूभाऊ अवचार उपस्थित होते.