नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूर ग्रामपंचायत निवडणुकीत १७ पैकी १२ सदस्य हे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोकराव अंभोरे यांचे क्रांती पॅनल, अशोकराव देशमुख यांची तिसरी आघाडी व सलीम गवळी यांच्या जय हो पॅनलचे निवडून आले आहेत. येथील सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित असून, या गटात निवडून आलेल्या १२ सदस्यांत राजकन्या अढागळे या एकमेव अनुसूचित जातीमधून निवडून आलेल्या सदस्य आहेत. त्यामुळे १६ फेब्रुवारी रोजी होणा-या सरपंच पदाच्या निवडणुकीत राजकन्या यांचाच राजयोग असल्याचे निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे डॉ. गाभणे व शर्मा यांच्या एकता गटाचे केवळ पाच सदस्य निवडून आले आहेत. एकता गटाकडून सिंधू कांबळे या अनुसूचित जातीत निवडून आलेल्या एकमेव सदस्य आहेत; मात्र त्यांच्या गटाची सत्ता होणे जवळपास अशक्यच आहे. उपसरपंच पद हे अशोकराव अंभोरे, अशोकराव देशमुख, सलीम गवळी, दस्तगीर पैलवान तसेच तसावरखा पैलवान व गटाचे प्रमुख पदाधिकारी हे आपसात चर्चा करून निश्चित करणार असल्याची माहिती त्यांच्या गटाकडून प्राप्त झाली आहे.
शिरपूर येथे ‘राजकन्या’चा राजयोग निश्चित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:38 IST