तळप बु. (वाशिम): विविध संकटांचा सामना करणार्या शेतकरी वर्गावर निसर्गाप्रमाणेच वीज वितरणचीही अवकृपा होत असून, तळप बु. येथील अनेक दिवसांपासून निकामी झालेल्या विद्युत रोहित्रांमुळे रब्बीचा हंगामही धोक्यात आला आहे. यंदा कमी पावसामुळे शेतकर्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतर रोगराईमुळे पिकांवर संकट आल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद ही पिके बुडाली, तर सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही मोठय़ा प्रमाणात घट आल्याने शेतकर्यांच्या हाती काहीच लागले नाही. आता रब्बीच्या हंगामात खरिपाची कसर भरून काढण्याची तयारी शेतकर्यांनी चालविली आहे; परंतु रब्बीच्या पिकांचे सिंचन करण्यासाठी पाण्याची सोय असली तरी, नियमित वीजपुरवठा होणे आवश्यक आहे. मानोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी रोहित्र निकामी झाले असून, त्यामधील थोड्याशा बिघाडामुळे वीजपुरवठा कित्येक तास खंडित होतो आणि पिकांना पाणी देणे शेतकर्यांसाठी शक्य होत नाही. या ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात आले नाहीत, तर खरिपानंतर यंदाचा रब्बी हंगामही बुडण्याची भीती शेतकर्यांना वाटत आहे. खात्रीलायक माहितीनुसार मानोरा तालुक्यातील जवळपास ४0 गावांतील विद्युत रोहित्र निकामी झाले आहेत किंवा जळालेले आहेत. परिसरातील तळप, कार्ली या गावांतही हीच परिस्थिती आहे. त्यातच वीज वितरणकडून मोठय़ा प्रमाणात भारनियमनही करण्यात येत आहे. शेतकर्यांना विजेची आवश्यकता नसते. त्यावेळी वीज वितरणकडून भारनियमन करण्यात येत नाही. शेती सिंचनासाठी विजेची आवश्यकता असते. त्यावेळेस मात्र मोठय़ा प्रमाणात भारनियमन करण्यात येते. यावर्षी शेतकर्यांचा खरीप हंगाम अत्यल्प पावसामुळे पार बुडाला. या हंगामात लावलेला खर्चही शेतकर्यांना मिळू शकला नाही.
नादुरुस्त रोहित्रामुळे रब्बी हंगाम धोक्यात
By admin | Updated: October 27, 2014 00:37 IST