-----------
आरोग्य केंद्रातील ४ पदे रिक्त
धनज बु.: कारंजा तालुका आरोग्य विभागांतर्गत धनज बु. परिसरात आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत रिक्त पदांची समस्या वाढतच आहे. सद्यस्थितीत येथील आरोग्य केंद्रात विविध संवर्गातील ४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना उपचार सुविधा मिळणे कठीण झाले आहे. ही पदे भरण्याची मागणी जि.प. सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांनी शुक्रवारी केली.
---------------
शिक्षकांच्या कोरोना चाचणीसाठी शिबिर
कामरगाव: गेल्या चार दिवसांपूर्वी धनज बु. येथील दोन शिक्षक कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. त्यामुळे शिक्षण विभाग सतर्क झाला असून, पाचवी ते आठवीच्या शाळेतील ज्या शिक्षकांची कोरोना चाचणी झालेली नाही, अशा शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यासाठी पुढील आठवड्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
-----------------
शेतजमीन नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षा
धनज बु.: गत पावसाळ्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे ६० हेक्टर शेतजमिनी खरडून गेल्या. प्रशासनाने या नुकसानाची पाहणी केली; परंतु सहा महिने उलटले तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. याची दखल तहसीलदारांनी घेण्याची मागणी जि.प. सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांनी शुक्रवारी केली आहे.