वाशिम : शहरातील झाडांवर लावण्यात आलेले जाहिरात फलक अलीकडे धोक्याचे ठरू लागले आहेत. सदर फलकांमुळे झाडांना ईजा होऊन झाडे कमकुवत होऊ लागली आहेत. वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत असून त्यावर कुठलीही कारवाई करीत नसल्याने वृक्षप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा या ब्रिदातून शासन पर्यावरण रक्षणाचा संदेश देते. झाडे लावल्यानंतर त्यांच्या संगोपनासाठी काही विभागांवर जबाबदार्या टाकण्यात आल्या आहेत. त्यासाठी अधिकार्यांची नेमणूकही करण्यात आली आहे. एकीकडे वृक्षप्रेमी वृक्ष संवर्धनासाठी झटतात. दुसरीकडे काही महानुभव केवळ आपल्या जाहीरातबाजीसाठी लावलेल्या झाडांना ईजा पोहोचविण्यास मागेपुढे पाहात नाहीत. शहरातील अनेक झाडांवर बिनदिक्कतपणे खिळ्यांनी जाहिरातींचे फलक ठोकलेले आहेत. काही ठिकाणी झाडांचे खोड कोरून त्यात देवादिकांच्या मूर्ती बसविलेल्या आहेत. वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत असून त्याबाबत कुठलीही कारवाई करीत नसल्याने वृक्षप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहरात फिरताना वृक्षांचे होत असलेले हाल ठिकठिकाणी बघायला मिळतात. वनकायदा एवढा सक्षम असतानाही त्याचे पालन अजिबात होताना दिसत नाही. गावाबाहेरच्या रस्त्यालगतचे एकही झाड असे नाही, ज्यावर जाहिरातीचा फलक लागलेला नाही.
जाहिरातबाजी झाडांच्या मुळावर
By admin | Updated: June 1, 2014 00:24 IST