मालेगाव: प्रवाश्यांच्या सेवेत ही बिरूदावली मिरविणार्या राज्य परिवहन महामंडळाचे मालेगाव येथील बसस्थानक आजमितीला नाना समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छतेचा तर मागमुसही नाही, रात्रीचे सोडा दिवसाही काही बसफेर्यांच्या चालकांना या स्थानकांचे वावडेच दिसून येते. याचा फटका प्रवाश्यांना सोसावा लागत आहे. मालेगाव शहराला सुमारे १३0 खेडी जोडलेली आहेत. येथील प्रवाश्यांना बाहेरगावी प्रवास करायचा असल्यास मालेगावच्या बसस्थानकावरूच बसमध्ये बसावे लागते. शिवाय येथून काही विद्यार्थी मेहकर, वाशिम, पातूर, रिसोड, अकोला या ठिकाणी दररोज बसनेच जा ये करतात.या प्रवाश्यांना मालेगावच्या नविन बसस्थानकावर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या ठिकाणी फक्त एकच वाहतूक नियंत्रक नियुक्त केलेला असतो. रविवारला तर दिवसभर वाहतूक नियंत्रक कक्षच बंद असून बसस्थानक रामभरोसे असते. सकाळी १0 ते 0६ अशी सलग ८ तास ड्युटी असलेल्या नियंत्रकांना कुठेच जाता येत नाही; जर गेले तर गाड्यांची नोंद घेतल्या जात नाही. पर्यायाने वाहतूक नियंत्रक नसल्याच्या कारणावरुन वाहक चालक बस नविन बसस्टॅन्डला आणतच नाही. बर्याचवेळा गाडी कोणती किती वाजता येते ती कोणालाच विचारावी असा प्रश्न प्रवाशांना पडतो.सकाळी व सायंकाळी ५ नंतर बसेसच नविन बसस्थानकावर येत नाहीत. लांब पल्लयाच्या अकोला उस्मानाबाद यासारख्या बस तर दिवसाही नविन बसस्थानकावर येत नाहीत. बसस्थानकावरील वेळापत्रकात अनेक ठिकाणी खोडतोड केली आहे. वेळेत बदल झाल्याची नोंद नाही. गाडीची वाट पाहत उभे राहण्यापेक्षा बसतो म्हटले तर आतमध्ये घाणीचे साम्राज्य. येथे विज पुरवठा नाही परिणामी, भर उन्हाळय़ात पंख्याअभावी प्रवाशांना ताटकळत बसावे लागत आहे. रहावे लागते. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आसपासच्या हॉटेलमध्ये स्वच्छ पाणी व थंड पाणी मिळत नसल्याने प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड पडतो. रात्री केवळ २ बसेस मुक्कामी असतात. अंधाराचा फायदा घेवून काही असामाजिक तत्वांचा मुक्त संचार त्या ठिकाणी सुरु असतो. संबधितांनी याकडे लक्ष देवून समस्यांच्या गर्तेत असलेल्या बसस्थानक सुधरावे.
मालेगाव बसस्थानकात समस्याच समस्या!
By admin | Updated: May 14, 2014 00:47 IST