गत खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यात ५९ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात तूर पिकाची पेरणी झाली. या हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीने सुरुवातीच्या तीन महिन्यांत उडीद, मूग, सोयाबीनसह कपाशीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले, तरी तुरीचे पीक मात्र तरले होते. तथापि, हे पीक शेंग, फूलधारणेवर असतानाच ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे या पिकालाही फटका बसला. अनेक ठिकाणी मररोगामुळे या पिकाच्या उत्पादनात मोठी घट आली. अनेक शेतकऱ्यांना, तर केलेला खर्चही वसूल होण्याची आशा राहिली नाही. आता तुरीची काढणी अंतिम टप्प्यात असताना बाजारात या शेतमालाची आवक वाढली आहे. आवक वाढत असतानाच तुरीच्या दरातही सतत तेजी येत आहे. त्यात कारंजा येथील बाजार समितीत सोमवारी तुरीला अधिकाधिक ६ हजार ६०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहेत. प्रत्यक्षात जिल्ह्यातील सर्वच बाजार आणि उपबाजारात तुरीची हमीदरापेक्षा ३०० रुपयांहून अधिक दराने खरेदी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
---------------------
उत्पादन घटल्याने शेतकरी निराश
जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीला हमीदरापेक्षा खूप अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना एकीकडे दिलासा मिळत असला तरी गत महिन्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे या पिकावर मररोगासह विविध किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट आली. अनेक शेतकऱ्यांना एकरी दोन क्विंटलचे उत्पादन या पिकातून झाले, तर अनेकांना या पिकाची काढणीही परवडली नाही. त्यामुळे मात्र शेतकरीवर्गात निराशेचे वातावरण आहे.
--------------
बाजार समित्यांतील तुरीचे दर
बाजार समिती किमान कमाल
कारंजा ५२५० ६६००
मानोरा ५६५० ६४७५
मंगरुळपीर ५२०० ६४५९
रिसोड ५६१५ ६२१०
वाशिम ५३५० ६१५०
-----------------------------
कोट: गेल्या आठवडाभरापासून तुरीच्या दरात तेजी आल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. आठवडाभरात तुरीचे दर ३०० रुपयांनी वाढले आहेत. तथापि, यंदा मररोगासह विविध किडींमुळे या पिकांच्या उत्पादनात मोठी घटही आल्याने शेतकऱ्यांना म्हणवा तेवढा फायदा झालेला नाही.
-नितीन उपाध्ये,
शेतकरी, काजळेश्वर