तूर, मूग, उडीद, हरभरा, मसूर अशा सर्वच प्रकारच्या डाळींचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशात डिसेंबर २०२० या महिन्यात भाजीपाल्याच्याही दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गृहिणींचे आर्थिक मासिक बजेट पूर्णत: कोलमडले होते. ही दरवाढ संपूर्ण डिसेंबर महिन्यात कायम राहिली; मात्र नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. ही परिस्थिती दुसऱ्या आठवड्यातही कायम राहिली असून, रविवारच्या बाजारात हिरवी मिरची ६०, गाजर ४०, पत्ता व फुलकोबी ४०, टमाटर १०, आवरा शेंग ६०, दुधी भोपळा ३०, वटाणा ४०, वांगी ४०, मेथी-पालक २० रुपये प्रतिकिलो असल्याचे दिसून आले.
..................
खाद्यतेलाचे दर कमी होईना
शेंगदाणा, सोयाबीन या खाद्यतेलाच्या दरामध्ये चालू आठवड्यातही वाढ झालेली आहे. १५ किलो तेलाच्या एका कॅनसाठी काही महिन्यांपूर्वी १५०० रुपये द्यावे लागत होते, ते दर आता दोन हजारांच्याही पुढे गेले आहेत. यामुळे जेमतेम परिस्थिती असलेले नागरिक त्रस्त आहेत.
..................
फळांचे दरही उतरले
गत आठवड्यात वाशिमच्या बाजारपेठेत सफरचंद आणि अंगूर २०० रुपये प्रतिकिलो; तर डाळिंब, संत्री १०० रुपये आणि चिकूची ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली होती. हे दर चालू आठवड्यात निम्म्याने कमी झाले आहेत. पेरूची ५० रुपये प्रतिकिलोने विक्री झाली.
- मो गौस शे इब्राहिम, फळविक्रेता
......................
सर्वच प्रकारच्या डाळींचे दर वाढल्याने तथा नियमित स्वयंपाकात डाळींचा भाज्या म्हणून वापर करणे अशक्य आहे. यामुळे पालेभाज्यांचे दर कमी होण्याची प्रतीक्षा होती. आजच्या बाजारात तुलनेने सर्वच प्रकारचा भाजीपाला स्वस्त मिळाला.
- वंदना किसन मोकळे, गृहिणी
......................
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात होणाऱ्या भाजीपाल्याच्या हर्रासीमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. त्यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत यावेळी स्वस्त भाजीपाला मिळाला. ग्राहकांचे प्रमाणही अधिक राहिले.
- गणेश गाभणे, भाजीविक्रेता
................
कोथिंबीरचे दर नीचांकावर
स्वयंपाकातील कुठलीही भाजी कोथिंबीरशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्याच कोथिंबीरचे दर सध्या नीचांकावर पोहोचले आहेत. पाच रुपयांना एक मोठी जुडी कोथिंबीर मिळत आहे. हे दर १५ दिवसांपूर्वी चांगलेच वधारले होते, हे विशेष. कांदा आणि आलूची आज ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली; तर लसूणला १२० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.