मालेगाव (जि. वाशिम): तालुक्यातील कळंबेश्वर येथे युवकाच्या हत्या प्रकरणातील एका आरोपीला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात पोलिंसांना यश आले. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, विद्यमान न्यायालयाने त्याला २२ मार्चपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली. मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळंबेश्वर येथील जनाबाई भिकाजी गवई यांनी १९ मार्च रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, १८ मार्च रोजी त्यांचा मुलगा निरंजन भिकाजी गवई (३८) हा मेडशी येथून बाजार करून, कळंबेश्वर येथे शेतातील घरी आला आणि सायंकाळी गुरांच्या गोठय़ासमोर बाज टाकून झोपला होता. त्याच्या बाजूला दुसर्या बाजीवर त्याची आई जनाबाई भिकाजी गवई (६५) झोपली होती. रात्री ९ नंतर दोन अज्ञात इसम तेथे आले व त्यांनी निरंजनच्या आईला पायावर जबर मारहाण केली. आईच्या आवाजामुळे निरंजनला जाग आली. त्या अज्ञात इसमांनी यानंतर निरंजन गवई यांना जबर मारहाण केली. यामध्ये निरंजनचा मृत्यू झाला. पोलीस प्रशासनाने चौकशी केली असता, कडूजी लक्ष्मण मोरे याला अटक केली. आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. जनाबाई गवई यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३0२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी चक्रे व मालेगावचे ठाणेदार के.आय. मिर्झा यांनी घटनास्थळी पाहणी केली. दुसर्या दिवशी कोणालाही अटक झाली नव्हती.
युवकाच्या हत्याप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी
By admin | Updated: March 21, 2016 01:46 IST