लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या मातीतून आलेल्या जवळपास ५० खेळाडूंनी चालू वर्षात विभाग, राज्य, राष्ट्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत जिल्ह्याचा गौरव वाढविला तर दुसरीकडे तालुकास्तरीय क्रीडा संकुलांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत नसल्याने काही खेळाडूूंमधून नाराजीचा सूरही उमटत आहे. १ जुलै १९९८ रोजी उदयाला आलेल्या वाशिम जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय होण्यासाठी तब्बल ११ वर्षाचा कालावधी लागला. २ मार्च २००९ पासून येथे नियमित कार्यालय सुरू झाल्यानंतर क्रीडा जगताच्या नकाशावर जिल्ह्यातील खेळाडूंचे नाव झळकू लागले. चालू वर्षात जिल्ह्यातील जवळपास ५० खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतिय क्रमांक पटकाविला आहे. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाºया खेळाडूंचा सन्मान २९ आॅगस्ट या क्रीडा दिनी क्रीडा विभागातर्फे केला जाणार आहे.दुसरीकडे तालुका पातळीवरही खेळाडू तयार व्हावे, यासाठी सुसज्ज असे तालुका क्रीडा संकुल असणे आवश्यक आहे. मानोरा, कारंजा व मंगरूळपीर येथे तालुका क्रीडा संकुल आहे. कारंजा येथील क्रीडा संकुलाचा अपवाद वगळता मानोरा व मंगरूळपीर येथील क्रीडा संकुलात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने क्रीडाप्रेमींचा हिरमोड होत आहे. रिसोड व वाशिम येथे तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न निकाली निघण्याच्या प्रतीक्षेत आहे. मालेगाव येथे तीन वर्र्षांपूर्वी तालुका क्रीडा संकुलासाठी नागरतास येथील सर्वे नंबर ११० मधील साडेतीन एकर शासकीय जागा मिळाली. येथे भव्य स्वरुपाचे तालुका क्रीडा संकुल उभारले जाईल, असा दावा करण्यात आला होता. या क्रीडा संकुलाचे कामही सुरू झाले. मात्र, पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध नसल्याने काम पुर्णत्वाकडे आले नाही. येथे ४०० व २०० मीटर धावन मार्ग, इनडोअर गेम हॉल, खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डीची प्रत्येकी दोन मैदाने, बॉस्केटबॉल कोर्ट, लॉन टेनिस वा अन्य सुविधा, क्रीडा साहित्य उपलब्ध केले जाईल, असा दावा सुरूवातीला करण्यात आला होता. याशिवाय पाणीपुरवठा, नालीची व्यवस्था, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत आदी मुलभूत सुविधादेखील प्रस्तावित आहेत. निधी उपलब्धतेनुसार क्रीडा संकुलाचा कामांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते.
वाशिम जिल्ह्यातील खेळाडूंची चमकदार कामगिरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:51 IST