देपूळ: ह्यऑन लाईनह्ण दाखले मिळण्याची सेवा नागरिकांसाठी डोके दुखी ठरत असून, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र आदि दाखले तीन दिवसांत देण्याच्या दावा करणार्या महा ई सेवा केंद्रावर दाखल्यासाठी प्रत्यक्ष १0 दिवसांचा कालावधी लागत आहे. या दाखल्यांवर तहसीलदारांची संगणकीय स्वाक्षरी (डिजीटल सिग्नेचर) होत नसल्यामुळे देपूळ येथील नागरिकांना त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले घेण्यासाठी महा ई सेवा केंद्रावर पायपीट करावी लागत आहे. पूर्वी उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आदि दाखले तहसील कार्यालयातून तहसीलदारांच्या स्वाक्षरीने मिळत होते; परंतु शासनाने हे दाखले कमी वेळेत मिळावेत म्हणून ई सेवा केंद्रांची संकल्पना अस्तित्वात आणली आणि या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने दाखले देणे सुरू केले. शासनाचा हा निर्णय नागरिकांच्या हिताचाच होता; परंतु ऑनलाईन पद्धतीने मिळणार्या दाखल्यांवर तहसीलदारांची स्वाक्षरी होण्यास विलंब लागत असल्याने संबंधितांना या दाखल्यांसाठी ८ ते १0 दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. महा ई ऑन लाईनच्या सर्व्हरची संथगती, तसेच अधिकार्यांच्या इतर कामांची व्यस्तता, अशी काही कारणे संगणकीय स्वाक्षरी वेळेवर न होण्यास कारणीभूत असल्याचे महा ई ऑन लाईन केंद्रावर सांगण्यात येते. त्यामुळे नागरिकांची पायपीट आणि वेळ वाचविण्यासाठी अस्तित्वात आलेली ऑन लाईन दाखल्यांची सुविधा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान निवासी नायब तहसीलदार निलेश मडके यांनी आमच्याकडे स्वाक्षरीसाठी दररोज ४00 ते ५00 दाखले येतात आणि संगणकीय स्वाक्षरी करण्याचे अधिकार केवळ दोघांनाच आहेत, त्यामुळे वेळ होत असल्याचे सबब पुढे केली.
‘ऑनलाईन’ दाखले ठरताहेत डोकेदुखी
By admin | Updated: September 7, 2014 03:01 IST