अनसिंग (वाशिम) : अनसिंग ते पुसद रस्त्यावर शेलू (बु) फाट्यानजिक अनसिंगकडून पुसदकडे जाणार्या इंडिका व्हिस्टा या गाडीच्या चालकाने निष्काळजीने भरधाव गाडी चालवून अनसिंगकडे जाणार्या दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने यामध्ये एक जण जागीच ठार व एक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री दरम्यान घडली. इंडिका गाडीचा चालक फरार झाला. अनसिंग पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी विनोद दगडूजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीचा भाऊ विजय दगडुजी शिंदे रा. अनसिंग (मारवाडी) व शे. नियमित शे. गफुर हे पुसद रोडने आपल्या मारवाडी (खुर्द) गावावरुन अनसिंगकडे टी.व्ही.एस. कंपनीच्या दुचाकीने येत असताना पुसदकडे जाणारी इंडिका व्हिस्टा पांढरा रंग गाडी क्रमांक एम.एच. २९ एडी 0९८६ ने मोटारसायकलला समोरुन जोरदार धडक दिली. या धडकेत विजय दगडूजी शिंदे वय ४0 वर्षे हा जागीच ठार झाला व सोबत असलेला शे. नियामत शे. गफूर याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. ही घटना घडताच इंडिकाचा चालक व त्यातील प्रवास करणार्यांनी अपघातग्रस्त मोटारसायकलस्वारांना सोडून त्याची कुठलीही मदत न करता फरार झाले आहे. यावरुन अनसिंग ठाणेदार यांनी आरोपीवर ३0४ अ, २७९, ३३८ भादंवि १८४ मोटार अँक्ट नुसार गुन्हा नोंदविला आहे व सदर आरोपीचा शोध घेत आहेत. या अपघातात ठार झालेले विजय दगडुजी शिंदे अनसिंग व परिसरातील लोकांच्या सुखा-दु:खात नेहमी उपयोगी पडत असल्यामुळे अनसिंग व मारवाडी परिसरात हळहळ होत आहे.
शेलुनजिक अपघातात एक ठार, एक जखमी
By admin | Updated: December 5, 2014 00:33 IST