शहरातील गुलबावडी भागातील शेख इमरान हा आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच. ३७ आर.२४६८ ने आपल्या सहकारी सज्जाद खानसोबत लोणीहून रिसोडकडे येत होता. वन उद्यानाजवळ रस्त्याच्या कडेला ते थांबले. मित्र लघुशंकेस गेला तर इमरान गाडीवरच बसून राहिला. त्याच वेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या दुचाकी क्रमांक एम.एच. ३७ पी. ०७४१ ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या घटनेत इमरान गंभीर जखमी झाला.
जखमी अवस्थेत शेख इमरानचा मित्र सज्जादने अन्य लोकांच्या मदतीने त्यास येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी इमरानला पुढील उपचारासाठी तातडीने वाशिम येथे रुग्णालयात पाठवले. मात्र इमरानची प्रकृती जास्त खालावल्याने त्यास वाशिम येथील डॉक्टरांनी अकोला येथे उपचाराकरिता नेण्यास सांगितले. मात्र अकोला येथे नेत असताना इमरानचा मृत्यू झाला.