मानोरा तालुक्यातील म्हसणी या गावाला कारंजा-मानोरा या मुख्य मार्गाला जोडण्यासाठी सुमारे २० वर्षांपूर्वी इंझोरी-म्हसणीदरम्यान सात किलोमीटर अंतराचा डांबरी रस्ता तयार करण्यात आला. म्हसणीवासीयांना या मार्गाशिवाय कारंजा-मानोरा मार्गाला जोडणारा दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे या मार्गाची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे; परंतु वाहनांची सततची वर्दळ आणि डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याची पार वाट लागली. त्यामुळे ग्रामस्थ आणि वाहन चालकांना अडचणी येऊ लागल्या. ही समस्या दूर करण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपूर्वी रस्त्याचे नूतनीकरणकही करण्यात आले. तथापि, कामाचा दर्जा सुमार असल्याने आता पुन्हा या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. मार्गावरील खड्डे आणि खडीमुळे अनेकदा दुचाकी घसरून चालक जखमी होण्याच्या घटनाही या मार्गावर घडल्या. ‘लोकमत’ने ९ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित करीत ग्रामस्थांच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत आमदार राजेंद्र पाटणी यांनी शासनाकडे पाठपुरावा करून या मार्गाच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. येत्या काही दिवसांतच या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
------
प्राथमिक स्तरावर डागडुजी
इंझोरी-म्हसणी रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट असल्याने या मार्गाच्या नूतनीकरणासाठी आमदार राजेंद्र पाटणी यांनी एक कोटी रुपयांचा निधीही मंजूर करून घेतला; परंतु प्रत्यक्ष नूतनीकरणाच्या प्रक्रियेचा विलंब लागणार आहे. त्यामुळे तात्पुरती सोय म्हणून या मार्गावरील खड्डे बुजवून डागडुजीच्या कामाला येत्या आठवडाभरात सुरुवात केली जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिली.
===Photopath===
010221\01wsm_2_01022021_35.jpg
===Caption===
इंझोरी-म्हसणी रस्त्याची अवस्था