रिसोड : नगर परिषद क्षेत्रामध्ये बांधकाम विभागात अतिशय महत्त्वपूर्ण असलेले नगर अभियंता हे पद तब्बल दीड वर्षापासून रिक्त असून, बांधकाम क्षेत्रातील कामे खोळंबली आहेत. न.प. मध्ये बांधकाम विभागाकडे अनेक कामे प्रलंबित अवस्थेत आहे. कायमस्वरूपी नगर अभियंता हे पद ३0.१0.२0१३ पासून रिक्त आहे. या पदाकरिता अद्यापही कायमस्वरूपी अधिकारी मिळाला नाही. दीड वर्षाच्या काळामध्ये प्रभारी नगर अभियंता म्हणून तीन अधिकारी आलेत व त्यांच्याकडे आठवड्यातून २ दिवस कामकाज पाहण्याचा अधिकार देण्यात आला होता. यामध्ये वाशिम येथून घोगरे, वहाब व मंगरुळपीर येथून दंडवते या अधिकार्यांचा समावेश होता. तर दंडवते यांनी एक दिवस प्रभार घेऊन बांधकाम विभागाला दंडवत केले आहे. गत दीड महिन्यापासून नगर अभियंता पदाचा कोणीच वाली नाही. त्यामुळे कायमस्वरुपी नगर अभियंता मिळावे, याकरिता न.प. प्रशासनाने वरिष्ठ अधिकार्यांकडे साकडे घातले आहे; पण अद्यापही शासनाला जाग आली नाही. न.प. क्षेत्रातील बांधकामे प्रकरणे तसेच एकात्मिक घरकुल योजना, रमाई घरकुल योजना संबंधित बांधकामे खोळंबली आहे. सदर योजनेला घरघर लागली आहे. शासनाच्या दिरंगाई भूमिकेमुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दीड वर्षापासून रिसोड नगर परिषद बांधकाम विभाग वा-यावर
By admin | Updated: May 12, 2015 01:16 IST