वाशीम : जिल्हा विकासाच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळणार्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडून द्यावयाच्या २१ सदस्यपदासाठी २९ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये सदस्यत्वासाठी चुरस असल्याचे जवळपास निश्चीत आहे. अर्थात दाखल वा अपात्र अर्जासंबंधी जिल्हाधिकार्यांकडे अपिल करावयाचा कालावधी व त्यांनी घ्यावयाच्या निर्णयानंतर म्हणजे ४ ऑगस्टनंतर यासंबंधी अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे. नियोजनानुसार जिल्हा नियोजन समितीमध्ये नागरी क्षेत्रामधून सर्वसाधारण प्रवर्गातील १ व ग्रामीण क्षेत्रातून २0 सदस्य निवडून देणे अपेक्षीत आहे. या २0 सदस्यांमध्ये अनुसूचित जातीमधील २, अनुसूचित जाती स्त्री २, अनुसूचित जमाती १, अनुसूचित जमाती स्त्री १ , नागरिकांचा मागास प्रवर्गातून ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ३, सर्वसाधारण ५, सर्वसाधारण स्त्री ३ अशा सदस्यांचा समावेश आहे. सदस्यत्वासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या २३ जुलैपर्यंतच्या मुदतीपर्यंत नागरी क्षेत्रातून एका जागेसाठी ५ तर ग्रामीणमधून २0 जागांसाठी तब्बल ३७ अर्ज सादर करण्यात आले होते. नामनिर्देशनपत्र छाननीनंतर नागरी भागातील १ तर ग्रामीण भागातील ५ अर्ज अवैध ठरले. नागरी भागातील उर्वरित चारही इच्छुकांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती असून, ग्रामीण भागातील जे ३७ अर्ज वैध ठरले होते त्यापैकी काहींनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्याने वैध अर्जापैकी २५ जणांचे प्रत्येकी एक असे २७ अर्ज नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरल्याची माहिती आहे. फेटाळल्या गेलेल्या अर्जकर्त्यांना २८ जुलैपर्यंत जिल्हाधिकार्यांकडे अपील करण्याचा अवधी असून, अपिलानंतर वैध नामनिर्देशनपत्राची अंतिम यादी ४ ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार असून ५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत राहणार आहे. निवडणूक लढविणार्या उमेदवारांची अंतिम यादी ६ ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे. तोवरी अपेक्षीत संख्येपेक्षा अधिक इच्छुक राहिल्यास आवश्यकता पडल्यास २६ जुलैला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान व २७ जुलै रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मतमोजणी होऊन मतदानाचा निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाने दिली.
२९ उमेदवारांचे नामांकन वैध
By admin | Updated: July 26, 2014 22:07 IST