वाशिम, दि. ९- येथील शासकीय रुग्णालयामध्ये एका महिलेने प्रसूती झाल्यानंतर नवजात अर्भकाला बेवारस टाकून पलायन केल्याची धक्कादायक घटना ७ मार्च रोजी घडली. दरम्यान, सदर महिलेने रुग्णालय प्रशासनास बनावट नाव आणि पत्ता सांगितल्यामुळे तिचा शोध अद्याप लागला नसल्याची माहिती पोलिसांनी गुरुवार, ९ मार्च रोजी दिली. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शबाना परवीन नासीरखा नामक महिला ७ मार्च रोजी प्रसूतीसाठी दाखल झाली. या महिलेची ७ मार्चला प्रसूती झाली असता, तिने पुरुष जातीच्या अर्भकाला जन्म दिला. प्रसूती झाल्यानंतर मात्र या निर्दयी मातेने नवजात अर्भक तेथेच सोडून दवाखान्यातून कुणालाही न सांगता पलायन केले. या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये रमाबाई युवराज घुगे नामक परिचारिकेने फिर्याद नोंदविली. त्यावरून पोलिसांनी शबाना परवीन नासीरखा हिच्याविरुद्ध भादंविचे कलम ३१७ अन्वये गुन्हा दाखल केला. या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी महिलेने सांगितलेल्या काकडदाती येथील तिच्या पत्त्यावर शोध घेतला; मात्र गावात सदर नावाची कोणतीच महिला वास्तव्याला नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यावरून सदर महिलेने आपले नाव आणि रहिवास पत्ता बनावट सांगितल्याचे उघड झाले. दरम्यान, या आशयाच्या महिलेला कुणी ओळखत असेल, तर त्यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रशेखर कदम व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव यांच्याशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
नवजात अर्भकाला टाकून मातेचे पलायन!
By admin | Updated: March 10, 2017 02:07 IST