प्रत्येक गावाच्या बसथांब्यावर सिमेंट रस्ता रुंदीकरण होत असल्याने प्रत्येक गावाच्या थांब्याचे रूपडे बदलणार आहे. हे जरी सत्य असले तरी एकाच रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक बहुतांश ठिकाणी बदल केलेला दिसतो. सदर रस्ता हा सुमारे तीन फूट खोदून त्यावर काम करण्याचे अंदाजपत्रक असल्याचे बोलले जाते. कारण मोप बसथांब्यादरम्यान अनेक मीटर रस्ता तीन फुटापर्यंत खोदून काम केले जात आहे. तर भर जहाँगीर बसथांब्यावर फक्त अर्धा फूट रस्ता खोदून थातुरमातुर काम केल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
रिसोड ते लोणार मार्गावरील डांबर रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. मोप, भर जहाँगीर, मांगवाडी या ठिकाणी तर अनेक अपघात झाल्याने रहदारी करणाऱ्यांमध्ये भीती पसरली हाेती. परंतु मागील दहा दिवसांमध्ये सदर कंत्रादार कंपनीने रस्ता कामांना वेग दिला असल्याने अनेकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे अनेक बसथांब्यासह प्रवाशी निवारे अतिक्रमणाच्या विळख्यात गेल्याने प्रवाशांसह रहदारी करणाऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत होती. हल्ली प्रत्येक बसथांब्यावर सिमेंट काँक्रीट रस्ता काम होत असून दहा मीटर रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. त्यामुळे अतिक्रमणाने व्यापलेले बस थांबे मोकळा श्वास घेणार आहे. परंतु सदर रस्त्याचे अंदाजपत्रक हे वेगवेगळे असल्याने ग्रामस्थ संभ्रमात पडले आहेत.