वाशिम : शारीरिक स्वास्थ्य जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे, याचा कोरोनाकाळात विचार होणे आवश्यक आहे. या उद्देशातून स्थानिक श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात २७ मे रोजी मानसिक आरोग्य आणि कोरोना आजार या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख, तर प्रमुख मार्गदर्शक जिल्हा रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रवींद्रकुमार अवचार, समुपदेशक सुनील सुर्वे तसेच विभागप्रमुख किशोर वहाणे, प्रा. वसंत राठोड, प्रा. विजय वानखेडे, प्रा. रवींद्र पवार, प्रा. मंगेश भुताडे, प्रा. जयश्री काळे, प्रा. प्रसेनजित चिखलीकर, प्रा. पंढरी गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक प्रा. पंढरी गोरे यांनी कोरोनाकाळामध्ये मानसिक आरोग्य जपण्याविषयीची आवश्यकता व समाजकार्य करणा-या विद्यार्थ्यांना समुपदेशन करताना कुठल्या बाबी आवश्यक आहेत, हे नमूद करून वेबिनार आयोजन करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. रवींद्रकुमार अवचार यांनी सर्वप्रथम मानसिक आरोग्याची संकल्पना स्पष्ट केली. तसेच कोरोना संक्रमण काळामध्ये मानसिक आरोग्य यावर कशाप्रकारे परिणाम होतो, हे परिणाम होण्याची कारणे व उपाययोजना यावर विस्तृत चर्चा केली. योग्य व पोषक आहार, निद्रा, व्यायाम, नकारात्मक विचार यापासून दूर तसेच आपले छंद व आपल्या कुटुंबातील लोकांसोबत संवाद, योग्य पुस्तकांचे वाचन, कलेची जोपासना तसेच आपण व्यक्त व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्यामध्ये एकाकीपण किंवा न्यूनगंड निर्माण होणार नाही. ही वेळसुद्धा जाणार आहे, या सकारात्मक विचाराने आपले मानसिक आरोग्य जपायचे आहे, असा संदेश त्यांनी दिला. प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य जपण्यासाठी आवश्यक बाबी याविषयी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे या कालावधीचा उपयोग आपले कौशल्य विकसित करण्यासाठी केला पाहिजे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संध्या शिंदे हिने केले, तर आभारप्रदर्शन कु. मयूरी अवताडे हिने केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवृंद, पालक यांनी उपस्थिती दर्शविली.