वाशिम : जिल्ह्यात निर्माण होणारी संभाव्य पाणी व चारा टंचाई लक्षात घेवून त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी सूचना मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव तथा वाशिम जिल्ह्याचे पालक सचिव के. एच. गोविंद राज यांनी दिल्या. वाशिम जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती व पीक पाहणी केल्यानंतर आयोजित केलेल्या सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यासह विवीध विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होता. यावेळी पालक सचिव श्री. के. एच. गोविंद राज यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती व उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. तसेच अतवृष्टी व गारपीट नुकसानग्रस्तांसाठी आलेल्या मदत निधीचे वाटप, जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरु असलेल्या विहीर कामांची माहिती घेतली. पाणी टंचाई संदर्भात आढावा घेतल्यानंतर श्री. के. एच. गोविंद राज म्हणाले कि, जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा व झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी पाहता जानेवारी अखेर जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवू लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी हात पंप दुरुस्ती, नवीन विंधन विहारी घेणे व आवश्यक तेथे खासगी विहारींचे अधिग्रहण करण्याचे काम त्वरित हाती घ्यावे. १५ जानेवारी २0१५ पूर्वी जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईवरील उपाययोजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात. त्याचबरोबर जिल्ह्यातील उपलब्ध चारा व आवश्यक चारा याबाबतही योग्य नियोजन करून कमी पडणारा चारा उपलब्ध करण्याबाबत नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली.
चारा, पाणी टंचाई निवारणार्थ तात्काळ उपाय योजना करा !
By admin | Updated: November 29, 2014 23:39 IST