रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील बबनराव लक्ष्मण सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीचे व्यवहार करून, रिसोड येथून सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान ते गावाकडे जाण्याकरिता निघाले होते.
त्यांच्याजवळ जमिनीच्या व्यवहारातून मिळालेली दोन लाख सत्तर हजार रुपयांची रक्कम होती. यातील एक लाख ८० हजार रुपयांची रक्कम त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत तर उर्वरित रक्कम खिशात ठेवली. गावाकडे जाताना सोबत दुचाकीवर त्यांची आई प्रयागबाई व दिव्यांग भाऊ माणिकही होते. हे तिघे दुचाकीने शेलू खडसेमार्गे जात असताना, रस्त्यात समोरून एका अज्ञात दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर, लगेच अज्ञात दोन दुचाकीस्वारांनी गाडीची डिकी फाेडून एक लाख ८० हजार रुपये घेऊन तेथून पळ काढला. या घटनेत बबनराव सानप यांच्या आई प्रयागबाई यांच्या डोक्याला व पायाला मार लागला असून, त्यांचे भाऊ माणिक यांना किरकोळ मार लागला. वृत्त लिहिपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत होती.